Thursday, 19 February 2015

II पाहताय ना राजे II


II पाहताय ना राजे II
=◆=◆=◆=◆=◆=◆=
पाहताय ना राजे..??
तुमच्या मावळ्यांची करणी..
तुमच्या जयंतीच्या नावाने
खेळ खेळतात राजकारणी..!!

जन्म तिथी महिन्यावरुन
नवे घोळ घालू लागले...
नव नव्या वदास मात्र
ख़त पाणी घालू लागले..!!
तुम्ही आमचेच न कोणाचे
छाती ठोकुन सांगू लागले..
तुमच्या नावासही राजे
राजकीय लेबल लागू लागले..!!
तुमचेच नाम जपता जपता
सत्तेचा गड चढू लागले..
विचारांस हरताळ फ़ासत
राजेच समजून नडू लागले..!!
मावळे सारे तुमचेच परी
गटा तटात विभागले गेले..
शिव जयंती उत्सव आता
संभ्रमात साजरे करू लागले..!!
🏼🏼🏼🏼
***********सुनिल पवार...

Wednesday, 18 February 2015

II तू II

II तू II
*******
येता समोर तू
हरवतो माझा मी...
नजरेत भरुन तू
माझ्यात नसतो मी..!!

नजरेचा तीर तू
दुबळे सावज मी...
मारता कटाक्ष तू
घायाळ असतो मी...!!

चालता मोरनी तू
हरपतो भान मी...
नुपूराची तान तू
तल्लीन भासतो मी...!!

अल्लड सरिता तू
स्तब्ध सागर मी...
सामावता माझ्यात तू
उधाण हासतो मी...!!
*************सुनिल पवार..

Tuesday, 17 February 2015

।। खरे प्रेम ।।

।। खरे प्रेम ।।
************
मन म्हणाले मला, चल आज प्रेमावर काही बोलू
तुझ्या माझ्या मनातले, अंतरमन आपण खोलू
मी म्हणालो मनाला, काय बोलायचे ते प्रेमावर
खरे प्रेम सांग ना, कुठे कुणाला कळलय आजवर..!!

मन म्हणाले इतकेच मला, इतरांच सोड रे, तुझ तू बोल
तुला तरी कळलय का कधी, खऱ्या प्रेमाचे मोल
चार दिवसाच्या प्रेमासाठी, आकाव तांडव करतोस
आई वडिलांच्या प्रेमास तू, सोईस्कर रित्या विसरतोस..!!

आणलं का रे कधी त्यांच्यासाठी, एखादं तरी फूल
त्यांनीच ना रे चढवली तुला, तुझ्या यशाची ती झूल
बहिणीची निःसीम माया, समजणार तरी कधी
वाटलं कधी करावी तीची, विचारपुस तरी साधी..!!

भावाशी कधी पटलच नाही, मनात प्रेम दाटलं नाही
भांडं तुझच गळकं होतं, म्हणून पाणी साठलं नाही
स्वार्थ म्हणजे प्रेम नाही, आकर्षणास ते कळत नाही
हृदयी प्रेम रुजावावे लागते, मागून कधी मिळत नाही..!!

ऐकून ते मनाचे बोल, डोळा पाणी दाटुन आले
समर्पण म्हणजेच प्रेम, नव्याने आज समजून आले
मनाचे बोल खरे अनमोल, द्वार तयाचे तुम्ही खोला
एकदाच मनाचे ऐकून पहा, नाही पटलं तर मग बोला..!!
***********************सुनिल पवार........

।। च्या मारी वैलेंटाइन च्या ।।

।। च्या मारी वैलेंटाइन च्या ।।
********************
काय म्हणावं राव ह्या सखुला
तीनं पुरता मामा बनीवला..
केसानं की हो गळा कापला
बेमालूम खीसा रिकामी केला..!!

गुलाब, टेडी आणखी काय काय
लागली फुकटी मागायला..
हौस तिची पुरवता पुरवता
लागलोया मी दमायला..!!

सालं समदचं लाड पुरीवलं
तीनं दुसरीकडच जमीवलं..
ह्या वैलेंटाइन डे न मला
आता आडवं तिडवं झोपीवलं...!!

च्या मारी वैलेंटाइन च्या
हिथं समदाचं हाय लोच्या
कोंबड़ी गेली दाणा टिपुन
कोंबड़ा मरतोय नुसत्याच टोच्या..!!
**************सुनिल पवार.....

।। वैलेंटाइनच्या नावानं चांगभलं ।।


।। व्हॅलेंटाईनच्या नावानं चांगभलं. ।।
=======================
 प्रेमाच विदेशी भुत आल
 तरुणाईच्या मानगुटीवर बसलं..
गल्ली बोळात प्रेम रुजलं..
बोला..
व्हॅलेंटाईनच्या नावानं चांगभलं...!!

व्यापाऱ्यांच आयात फावलं..
सावज आयत जाळ्यात गावलं..
डे च्या नावे सार खपवलं
तरुणाईच खेळण झाल..
बोला..
व्हॅलेंटाईनच्या नावानं चांगभलं...!!

बेधुंद तरुणाईचं भान सुटलं
सोज्वळ प्रेम बीभत्स झाल..
चेकाळणे माघ ओघानं आल
सभ्यतेन आपसूक डोळ मिटलं
बोला..
व्हॅलेंटाईनच्या नावानं चांगभलं..!!

शुद्ध प्रेमास ना वावड़ं कसलं
 दिवसापुरतं ते प्रेम कसलं..
 प्रेम चिरंतर असते सुंदर
 प्रेम हृदयी वसते निरंतर
तुमच चालू द्या
आम्ही आपल सहज म्हटलं..
बोला..
व्हॅलेंटाईनच्या नावानं चांगभलं...!!
********सुनिल पवार.......

Friday, 13 February 2015

II रंग प्रेमाचे II

II रंग प्रेमाचे II
**************
रंग प्रेमाचे कसे आगळे वेगळे
कोणास कळले, कोणास छळले..
पड़ती प्रेमात इथे सारेच वेडे
कोणास लाभले, कोण जळले..!!

नाते प्रेमाचे ते राधेशी जुळले
प्रेम रुक्मणीस लीलया कळले..
सत्यभामेस ना कधी उमजले
प्रेमाने मीरेस नाहक छळले..!!

धरेचे प्रेम तरी कुठे निराळे
भास्करा भोवती ह्रदय जाळे..
शशी बिचारा तो रात्रभर झुरे
सिंधुचे त्याकडे लागलेत डोळे..!!

सरितेच्या प्रेमाचे मेघास उमाळे
अल्लड सरिता सागराशी खेळे..
वारा तो व्यर्थच बेभान वाहे
धरेच्या उदरी बीज कोवळे..!!

एकाच्या प्रेमात दूसराच पोळे
कोणाच मन इथे कोण सांभाळे..
प्रेमात वाहती निर्झर डोळे
प्रेमाचे हे कसले सोहळे..??
वेड्या...
प्रेमाचे हे कसले सोहळे..!!
**********सुनिल पवार....

Wednesday, 11 February 2015

।। तुझ्या वीना ।।

।। तुझ्या वीना ।।
**************
ना लागे मन कशात
रमते नित्य विचारात..
एक तुझाच चेहरा सखे
वसलाय माझ्या मनात..!!

खुपसले डोके पुस्तकात
व्यक्त होते तूच शब्दात..
जादू ही कसली सखे
जागेपणी हे भास होतात..!!

फुले फलदाणीत हसतात
आठवण तुझी करून देतात..
ठावुक आहे का तुला सखे
गंध तुझाच घेवून येतात..!!

श्वासात तू ध्यासात तू
तूच दिसतेस चराचारात..
तुझ्या वीना नाही सखे
आनंद राहिला माझ्या जीवनात..!!
***************सुनिल पवार..

।। लाल गुलाब ।।

।। लाल गुलाब ।।
**************
रोज वाटायचे मला
तुला लाल गुलाब द्यावा
भाव माझ्या मनातला
फुलातून व्यक्त व्हावा..!!

औंदर्य फुलांचे सौंदर्य तुझे
सुरेख तयांचा मेळ व्हावा
तुझ्या माझ्या मिलनाचा
अलवर धुंद वेळ यावा..!!

पण
नव्हते काहीच नशिबात
राहिल्या गोष्टी साऱ्याच मनात
धजले ना मन कधी
फिरे माघारी क्षणात..!!

कित्येक गुलाब खरीदले
पाकळ्या विचारात सुकल्या
तुझ्या माझ्या भेटीच्या
बहुतेक वाटा चुकल्या..!!
*********सुनिल पवार...

II गीत II


II गीत II
*********
गीत तुझ्या ओठांचे, आता ना मज गायचे..
त्या हरवल्या सुरांनी, काय गुणगुणायचे..!!

उधळीत चांदण्या अशा , मैफिलीत सजायचे..
ओलेत्या पापण्यांनी , काय व्यर्थ हसायचे..!!

सांभाळू कसे मनास , वेड्यास ना कळायचे.
घेऊन कवेत काजळ, का वातीने जळायचे..!!

तालावल्या ह्या गर्दीत , माझ्यात मी रमायचे
नाहीच मेळ मनाचा , तिथे काय जमायचे..!!
***********************सुनिल पवार...

।। डोकावता बालपणात ।।

।। डोकावता बालपणात ।।
**********************
सहज डोकावले बालपणात
स्वच्छंद त्या वेड्या क्षणात..
बालपणीचे खेळ सारे
घालू लागले रुंजी मनात...!!

विटीदांडू लगोरीचा डाव न्यारा
आबादुबीचा राकट मारा
क्रिकेटचा सारा रंगच न्यारा
गल्लित भरे स्टेडियम सारा..!!

आट्या पाट्यांचा डाव सुरेख
खेळु कबड्डी तंगड़ी खेच..
रंग बिरंगी गोट्यांची ठेव
बुद्धिबळ घाली भलताच पेच..!!

कांदा फोडीच्या उंच उड्या
लपाछपित त्या मारल्या दड्या..
गिरकी घेई मधेच भावरा
कधी कुणाच्या काढल्या खोड्या..!!

नवा व्यापार झब्बू गुलाम चोर
बैठ्या खेळाचा भलताच जोर..
कधी आकाशी उंच पतंग
कधी तुटायचा कोणाचा दोर्..!!

दूरदर्शनचा काळ रमणीय फार
छाया गीत कधी चित्रहार..
रामायणाचा तो रमणीय भाग
ज्ञान दिप उजळी सुंदर विचार..!!

सांगू तरी किती मी खेळाचार
यादि मोठी नाही संपणार..
सरले बालपण बदलले आचार
मागे उरला आठवाणीचा आधार..!!
**************सुनिल पवार...

II अबोल माझ्या मना II

II अबोल माझ्या मना II
***********************
अबोल माझ्या मना
बोल काही तरी..
भेद तुझ्या मनातले
खोल आता तरी..!!

वेळ जाईल निघून
नाही येणार परतून
उडून जातील पक्षी
सारेच घरट्यातून,,!!

नको धरू अबोला
आता सोड दुजाभाव..
मनाचे तुझ्या औंदर्य
तू ही जगाला दाव..!!

घाल सर्वांस साद
ना राहणार विसंवाद..
एकोप्याने नांदू सारे
साधून गोड संवाद..!!
**********सुनिल पवार..

Wednesday, 4 February 2015

II चारोळी पुराण II

II चारोळी पुराण II
******************
चारोळीत असतात शब्द चार
चार शब्दांचे थोर विचार..
शब्द कमी बोलते फार
चारोळी देते जीवनास आकार..!!

मिश्किल कधी हास्य फुवार
कधी भासते तिखट मार..
शब्दांना तिच्या भलतीच धार
करते हळुवार काळजावर वार..!!

प्रेम आर्जवे ती कधी फार..
कधी असते विरहाची किनार..
शब्दात तिच्या अलवार श्रुंगार
प्रेमाचे अनेक चढ उतार ..!!

स्वप्न कधी घेते आकार
कधी बनते व्यंग टीकाकार..
शब्दाचा असा सुरेख अलंकार
थोडक्यात सांगतो जीवनाचे सार..!!
*********************सुनिल पवार.....

II एक ओळख अनोळखी II


एक ओळख अनोळखी...
एक ओळख अनोळखी
नजरेत घर करत गेली..
स्मृतीकिरणांचे अमूल्य मोती
ओंजळीत भरत गेली..!!
पैंजणांची रुणझुण जशी
गोड संवाद साधत गेली..
मौन साऱ्या भावनांना
हृदयातून दाद देत गेली..!!
आले भरून आकाश
दाटी मेघांची होत गेली..
मन चिंब चिंब भिजले
ती सर जशी बरसत गेली..!!
मी सहज मांडले शब्दातून
ती स्तुतीसुमने घेत गेली..
माझ्या अंतरातील कविता
माझ्या हृदयातून फुलत गेली..!!
***सुनिल पवार...✍️

Monday, 2 February 2015

II सखे II

II सखे II
*********
फिरून जन्म घ्यावे
सखे तुज समीप यावे..
तव बागेतील फुल बनुनी
नित्य तुज रिझवावे..!!
सखे,
नित्य तुज रिझवावे..!!

पहाट समयी तू अंगणी यावे
सखे, दर्शने मी खुलावे..
गुंफता मज श्वासात मग..
मन वा-यावर झुलावे..!!
सखे,
मन वा-यावर झुलावे..!!

हळूच मज स्पर्शावे
सखे, रोमांचित मी व्हावे..
माळता मज केशात मग
कुंतली मी खेळावे..!!
सखे,
कुंतली मी खेळावे..!!

नित्य तू सजावे धजावे..
सखे, तुज सवे फिरावे..
मधुर तुझ्या सहवासात
नित्य मीच असावे...!!
सखे,
नित्य मीच असावे...!!
**************सुनिल पवार....