Thursday, 29 January 2015

।। शब्द आता बोलू लागले ।।

।। शब्द आता बोलू लागले ।।
************************
निशब्द होते जे
शब्द आता बोलू लागले
वाऱ्यावरती जसे
पतंग आता डोलू लागले..!!

शब्दच होते ते
शब्दांनी शब्द वाढू लागले
जन माणसात असे
वाभाडे आता काढू लागले..!!

शब्दच किमयागार
होत्याच नव्हतं करू लागले
सच्छिद्र भांड्यातुनही
पाणी आता भरू लागले..!!

शब्द अलंकार असे
शाल जोडित सजु लागले
मन मानेल तसे
मनात आता रुजू लागले..!!

शब्द बंद कवाड़
भेद मनाचे खोलू लागले
समाधान मज इतकेच
की..
शब्द आता बोलू लागले..!!
******सुनिल पवार....

।। आपुलकीची फुले ।।


।। आपुलकीची फुले ।।
*******************
नाही ऐकले कधी मनाचे
का उभे घर ते जाळले
क्रोधाचा का धनी बनला
का क्रोधाने तुज पाळले..!!

मोती होते शब्द तुझे
का शस्त्र घातक जाहले
ओंजळीतल्या त्या सुमनांनी
रक्त असे का वाहिले..!!

काय योग्य काय अयोग्य
का नाही काहीच पाहिले
काय मिळाले सांग ज़रा
अन मागे काय ते राहिले..!!

नको पाळु रे क्रोधास
नाही त्यात काही भले
संयमाची घेवून परडी
वेच रे आपुलकीची फुले..!!
********सुनिल पवार..

Friday, 23 January 2015

II प्राजक्ताचे धन II


II प्राजक्ताचे धन II
==========
इवले इवले फुल
त्यास केशरी झूल..
प्राजक्ताचे फुल पाहून
मनास पडते भूल..!!

निर्मोही श्वेत मन
सुगंधित धुंद तन..
दरवळते चहुओर 
करते प्रफुल्लित मन..!!

अंगणी पडता सडा
होतो निलनभाचा भास..
अवचित उतरते धरा
जणू चांदण्यांची रास..!!

क्षणभंगुरसे जीवन परी
निर्मळ त्याचे मन..
अंतरी रुजावे सुमन
गंधित प्राजक्ताचे धन..!!
***सुनिल पवार...✍🏼

II डाव नियतीचा II


II डाव नियतीचा II
*******************
आयुष्याच्या क्लिष्ट पटावर
नियति डाव मांडत असते..
सद्गुणांच्या फास्यांनी
दान आपण मागायचे असते..!!

आले गेले कितीही शकुनि
धर्मास मात्र जागवायचे असते..
दुर्योधानाची मांडी तोडण्या
भीमास अंगी रुजवायचे असते..!!

लज्जा रक्षणा ते अबलेच्या
श्रीकृष्णा परी धावयाचे असते..
अधर्मा विरुद्ध लढण्या
पार्थासम गांडीव उचलायचे असते..!!

लोक हितासाठी कधी तरी
नरोवा कुंजरोवा म्हणायचे असते..
नियतीच्या डावात या
विजयास गवसणी घालायची असते..!!
***सुनिल पवार...

Wednesday, 21 January 2015

II गंधाळला श्वास II


II गंधाळला श्वास II
*******************
कुठे गंधाळला श्वास
का मनाचा भास
वा-यासवे येई
दरवळ तो खास..!!

तशीच माझी आस
का वेडा विश्वास
अंधाराल्या मनास
काजव्याचा सहवास..!!

दुर दिसे आकाश
का भासे जवळपास
चंद्र तो नभीचा
लुभावतो मज खास..!!

खंत ना मनास
का दोष दुराव्यास
आठवणीत नित्य
तू भेटते हमखास..!!
***सुनिल पवार....

Monday, 19 January 2015

II खळ (ख) ट्याग II

II खळ (ख) ट्याग II
********************
ट्यागाळली भिंत, नाही काही खंत
डागळाले शब्द, नसे त्यास अंत..!!

तुम्ही करा ट्याग, मी वाचतो निवांत
अजीर्ण बहु झाले, मी करतो रवंथ..!!

एखाद दूसरा त्यात, असतो विचारवंत
वाचून लिखाण, मन होते माझे शांत..!!

फुटकळ ती पोस्ट, पाहते फार अंत
कस सहु सांगा, मी नाही हो संत..!!
*****सुनिल पवार...

।। दुनया फेसबुकची ।।

।। दुनया फेसबुकची ।।
*******************
काल होते ते आज नाही
जोडले त्यात नवे काही
फेसबुकच्या ह्या झाडावर
येतात जातात थवे काही..!!

कोणास त्यात हवे काही
कोणास वाटते द्यावे काही
फेसबबुकच्या ह्या रानामधे
धुडगुस घालतात ग़वे काही..!!

कोणास चेहरा भावे काही
कोणास भावती नावे काही
फेसबुकच्या ह्या पिंजऱ्यामधे
फडफडतात असे रावे काही..!!

ज्याचे त्याने ठरवावे काही
कधी कुठे कसे वागावे काही..
फेसबुकच्या ह्या दुनयेमधे
तारतम्य तरी असावे काही..!!
************सुनिल पवार...

Friday, 16 January 2015

II का II


II का II
*******
का करतेस तू निराश
दाखवून मज आस..
तोड अबोल पाश..
बोल दिलखुलास..!!

का बदलतेस विधान
वळवून आपली मान..
उघड अधर पाकळी..
हस जरा तू छान..!!

का छळते तू जीवास
फुंकून त्यात प्राण..
सोड नयन बाण
कर पुन्हा निष्प्राण..!!
*************
सुनिल पवार
[चकोर]
 

Monday, 12 January 2015

II मैत्री II

II मैत्री II
*********
मैत्री असते जसे आकाश
सूर्य चंद्राचा दिव्य प्रकाश..
मैत्री म्हणजे निखळ सहवास
नभी ध्रुवाचा अढळ विश्वास..!!

मैत्री असते जसे पिंपळपान
जपले जाते जे पुस्तकात..
जीर्ण झाले जरी ते पान
रंग त्यावर छान सजतात..!!

मैत्री असते जसे जल निर्मळ
जे घेते प्रत्येक रंगाचा रंग..
इंद्रधनू जणू लोभसवाणे
खेळे उन्ह पावसा संग..!!

मैत्री असते जसा वृक्ष विशाल
दुखाःत सुखद छाया घनदाट..
रसदार फळांची अमृत धार
पाखरांचा सुमधुर किलबिलाट..!!

मैत्रीचे असते विश्वच न्यारे..
नभांगणात जसे असंख्य तारे..
भावतात माझ्या मनास सारे
प्रत्येक मित्र जरुरी जाण रे..!!
*************
सुनिल पवार
[चकोर]

|| आई ||


|| मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ||
===================
|| आई ||
=◆=◆=
आई वीना जग हे थीटे
तिच्याशिवाय ममत्व कोठे..
नका शोधु कुठे राऊळी
आई चरणी ईश भेटे..!!

तिन्ही जगाचा तो स्वामी
आईविना ठरला भिकारी..
देवादिकांसही दुर्लभ असे
वरदान आई जगास तारी..!!
ममतेचा तो विशाल सागर
करुणेची ती शीतल घागर..
ऐसी असते माय माउली
वृक्षापरी मायेचा पदर..!!
पहिला शब्द मुखी आई
आद्य गुरु ती असते माय..
महती तिची थोर इतकी
पामर मी वदणार काय..!!
आकाशाचा करून कागद
समुद्राची जरी केली शाई
वर्णन तिचे जमणार नाही
शब्दांनाही ते पेलणार नाही..!!
***********सुनिल पवार......

II घर II


II घर II
***********
घरच होते उन्हाचे माझे
सावलीची ना बात काही..
सावलीचा का दोष होता
उजळली जिथे रात नाही..!!

घायाळ ह्रदय शब्द शरांनी
तलवारीस त्या धार नाही..
रुतलेली सल मनात जिथे
तो काटा टोकदार नाही..!!

निघून गेलीस तू जिथे
आठवण जाता जात नाही..
उघड्यावरचे घर हे माझे
सावली इथे राहत नाही..!!
**************************
सुनिल पवार
[चकोर]

|| सवलत ||


|| सवलत ||
*********
सवलत,
देणारा देतोय
घेणारा घेतोय
मधेच सांगा
कोण बरे भरडतोय..??

सुपातलं जात्यात
जात्यातलं सुपात
जेवतोय सांगा
कोण बरे तुपात..??

नकोत जाती
नकोत पाती
बोलायच नुसत
अन खायाची माती..!!
*****************
सुनिल पवार
[चकोर]

Wednesday, 7 January 2015

||बाप अजुन राबतो आहे||

||बाप अजुन राबतो आहे||
*********************
निजलास बिनघोर बाळा
बाप अजुन जागतो आहे
पाखरांचे उज्वल भविष्य तो
अंधाराकडे मागतो आहे..!!

अर्ध पोटी राहून स्वतः
पोट तुझे भरतो आहे
शिकविण्यास तुला बाळा
जीवाच रान करतो आहे..!!

उघडा स्वतः राहून तो
अंग तुझे झाकतो आहे
हौस तुझी पुरविता बाळा
रोज थोड़ा वाकतो आहे..!!

मोठा झाला बाळ आता
मर्जीने त्याच्या वागतो आहे
सोडून गेला बाळ बापाला
बाप अजुन राबतो आहे..!!
*******************
सुनिल पवार
[चकोर]

Tuesday, 6 January 2015

|| लाईक / नालाईक ||

|| लाईक / नालाईक ||
*************
फुटकळ पोस्टला लाईक हजार
विचाराला कोणी भी विचारीना..
नावांची असते एलर्जी काहिना
भावतात ईथे कोणास ललना..!!

माया जालाची माया अचाट
वृति असते काहिंची पूचाट..
फिरकावे तरी कुठे कशाला
लेबल कविचे माझ्या उशाला..!!

लाईक कमेंटचा न मजला सोस
ना आत्मस्तुतिची मला हौस..
शब्दांचा मी खरा सवंगड़ी
पड़ेना का कुठेही पाऊस..!!
***********************
सुनिल पवार
[चकोर]

||संवाद प्रेमाचा||


|| संवाद प्रेमाचा ||
===========
ती म्हणाली,
तुला अँटीट्युड फार..
तो म्हणाला,
हे तर तुझंच हत्यार..!!
ती म्हणाली,
करू नको ना रे वार..
तो म्हणाला,
केवळ एक कटाक्ष मार..!!
ती म्हणाली,
असा होऊ नको रे कठोर..
तो म्हणाला,
तुझ्याच हाती आहे ग दोर..!!
ती म्हणाली,
खुप झालं.! आता पुरे कर..
तो म्हणाला,
सखे आधी सुरवात तर कर..!!
ती म्हणाली,
झाल गेलं आता सारं विसर..
तो म्हणाला,
तुझ्या शिवाय सारे चित्र धूसर..!!
ती म्हणाली,
माझ्या स्वप्नांचा तू चित्रकार..
तो म्हणाला,
सप्तरंगाची तूच मोहक अदाकार..!!
ती म्हणाली,
होईल ना रे स्वप्न साकार..?
तो म्हणाला,
तुझ्याच साथीने, घेईल ते आकार..!!
****सुनिल पवार...✍🏽😊

|| स्त्री एक शक्ती ||


|| स्त्री एक शक्ती ||
****************
तू ओळख नारी तुझी शक्ती
पुजतील जन करतील भक्ती..!!

अबला नव्हे तू सबला जाण
चराचरात प्रथम तुझाच मान..!!

आदि शक्ती तू देवी अंबाई
वात्सल्य मूर्ति तू प्रेमळ आई..!!

तुज विन व्यर्थ जीवन सकलांचे
समजू नको तू जीवन अबलांचे..!!

आठव जिजाऊ आठव सावित्री
सृष्टीची साम्राज्ञी तूच धारित्री..!!

तुझ्याच मुठित सामावले जग
एकदा तू डोळे उघडून तर बघ..!!
***********
सुनिल पवार
[चकोर]

।। पहिला दिवस ह्याचा त्याचा।।

पहिला दिवस ह्यांचा त्यांचा..

नववर्षाचा पहिला दिवस
असाच जात असतो
प्रत्येकजण आपल्यापरीने
स्वागत करत असतो
पाहूया का..??
कोण काय करत असतो..!!

कोण निद्रेत घालवतो
कोण श्रद्धेत रमवतो..
कोण असाच भागवतो
तर कोण मदिरेत जागवतो..!!

कष्टकऱ्याच्या कामास येतो
आळशाचा आरामात जातो..
धनिकाचा विचारात बसतो
तर सात्विकाच्या आचारात असतो..!!

कोणाच्या स्वप्नात गुंततो
कोणाच्या संकल्पात बरळतो..
कोणाच्या सहवासात बहरतो..
तर कोणाचा एकांतात तरळतो..!!

दिवस येत राहतात
वर्ष सरत जातात..
चर्चा घडत राहतात
काही विस्मृतित जातात
तर काही आठवणीत राहतात..!!
--सुनिल पवार..