Tuesday, 4 April 2017

|| मोरपीस ||

|| मोरपीस ||
========
मोरपिसा सवे
सुरु झालेला हा
मोरपिसा पर्यंतचा प्रवास
वाऱ्याच्या लहरीवर
मनाच्या हिंदोळ्यावर
हेलकावे खात
कधी उंच नभात
तर कधी खोल तळात
कधी रानावनात
तर कधी
सिमेंटच्या जंगलात
प्रत्येकाच्या मनोराज्यात
आपल्याच भाव विश्वात
सुखात, दुखाःत
असंख्य ज्ञात अज्ञात
अणू रेणूंच्या सानिध्यात
मोहक अशा रंगात
आनंदात, तरंगात
हरवून बसलो स्वतःस
किती सामर्थ्य हे
इवल्याशा मोरपिसात..!!
***सुनिल पवार....✍🏽

|| मुळाक्षरे ||

|| मुळाक्षरे ||
========
आठवतंय स्पष्ट
लहानपणी आईचं
बोट धरून गिरवलेली
ती मुळाक्षरे
अ आ इ ई
ग म भ न
त्या पुढे जोडलेले ते शब्द
अ रे अननसातला
ग रे गणपतीतला..
किती लोभस भासायची
तेव्हा ती अक्षरं
जणू अंगावर
तलम मोरपीस फिरायचे
हृदयात झरझर अमृत पाझरायचे..!!

आता
उलटून येतात अंगावर
तीच अक्षरं
अ ला अरे म्हणत
क ला कारे म्हणतात..
ग चा गाढव झाला
ल च्या लाथा हाणू लागला..
ज जातीत विभागला
बदकातला ब
बदल्यात गुंतला..
आता
खरंच वाटू लागलंय मनाला
मराठीचं काही खरं नाही
लोक म्हणतात तेच खरं असावं
इंग्रजी शिवाय ह्या राष्ट्राला
दुसरा कोणता पर्याय नाही
पण तरीही सांगू इच्छिते की 
माय मराठीची सर 
इंग्रजी पुतना मावशीस येणार नाही..!!
***सुनिल पवार...✍🏽🙏

Friday, 31 March 2017

|| फोन ||

😜तिच्यातील ती😜
=============
😂=|| फोन ||=😂
=============
मी करतो तिला फोन
नेहमीच
निवांत असेल समजून..
पण
वेळच नसतो तिला
ती उचलत नाही फोन
तरीही
मी बोलत नाही तोडून..
कारण
मी घेतो तिला समजून..!!

कधी
करते ती ही फोन
माझा मिसकॉल पाहून..
मी असतो तेव्हाच कामात
तरीही
उचलतो तिचा फोन
सांगू पाहतो तिला
पण
ऐकत नाही ती
मी ऐकतो सारं निमूट
कारण
मी घेतो तिला समजून..!!
कळलंच असेल तुम्हाला
गंभीर तसा इतका प्रकार नाही
फोन
कट करण्याची कुठे सोय नाही
आणि दुसरा तरणोपाय नाही
वळते लगेच संशयाची सुई
म्हणूनच
घेतोय जरा सावरून..
कारण
मी घेतो तिला समजून..!!
****सुनिल पवार...😜

Tuesday, 28 March 2017

|| विरह ||

|| विरह ||
======
तेज तलवार जशी,
ही विरहाची धार..
भेदून जाते लीलया,
हृदयाच्या आरपार..

जगणे होते मुश्किल,
मरणे त्याहून अवघड..
क्षणा क्षणास वाढते,
हृदयाची धडधड..!!
***सुनिल पवार...✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधील एक चारोळी)
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-77

|| कार्यकर्ता ||

|| कार्यकर्ता ||
=========
ते लढ म्हणाले
मी लढलो..
ते झाले सत्ताधीश
मी अडगळीत पडलो..!!

ते नड म्हणाले
मी नडलो..
ते सुटले सहीसलामत
मी नाहक अडकलो..!!
ते चढ म्हणाले
मी चढलो..
त्यांनी खेचले पाय
मी तोंडघशी पडलो..!!
ते पेट म्हणाले
मी पेटलो..
त्यांनी शेकली पोळी
मी राख झालो..!!
ते राजा म्हणाले
मी क्षणात हुळहुळलो..
त्यांनी केला अत्याचार
मी सहज विसरलो..!!
***सुनिल पवार...✍🏽

Friday, 24 March 2017

|| टोल धाड ||

|| खबर खोद के ||
============
|| टोल धाड ||
============
संपवणार म्हणता म्हणता
टोल धाड मात्र वाढत आहे..
फवारणीचा कुठे पत्ता नाही
सरकार बिल धाडत आहे..!!

संपून गेलीय मुदत औषधाची
उपचार अजून चालू आहेत..
भस्मासुरी रोग वाढत जातोय
डॉक्टर सारेच तकलादू आहेत..!!
पावलो पावली प्रचिती येते
रोगापेक्षा इलाज भयंकर..
नेता लुटतोय देश राजरोस
सामान्य मुकाट भरतोय कर..!!
****सुनिल पवार...✍🏽

|| प्रहर ||

|| प्रहर ||
=====
मुक्त हस्ते उधळले
सांज रंग क्षितीजात..
किती रंग दडलेले
सागराच्या उदरात..!!

ना तमात, ना प्रकाशी
ही वेळ कातरवेळ..
दोन ध्रुव दोन टोकी
कोण साधतो हा मेळ..!!
चंद्र आतुर मनाचा
उमलण्या तिमिरात..
चांदण्यांचा खेळ रंगे
भास आभास नभात..!!
गंधळतो हा प्रहर
रुजे स्वप्न लोचनात..
रातरणीचा बहर
घेतो भरून श्वासात..!!
***सुनिल पवार...✍🏽