Monday, 31 August 2015

***मनाच्या गाभाऱ्यात***

***मनाच्या गाभाऱ्यात***
=================
मनाच्या गाभाऱ्यात
मनाचे संग..
मनाच्या संगतीला
आठवणीचे रंग..!!

आठवणीच्या रंगावर
भावनेची चौकट..
भावनेच्या चौकटीत
मन माझे दंग..!!
*****सुनिल पवार....

|| माझ्या कोकणाची भूमी ||

अष्टाक्षरी
|| माझ्या कोकणाची भूमी ||
===============
माझ्या कोकणाची भूमी
दिसे सुंदर देखणी..
शालू हिरवा लेवुनी
नटे उल्हासे श्रावणी..!!


ओली वाट वळणाची
शुभ्र झऱ्यांचीच गाणी
धाव घेती नदीकडे
जसे भेटण्या साजणी..!!

भातरोपे चहुकडे
गालिच्याची अंथरणी..
वेेेल झूले बांधावर 
साजे काशिद्याची लेणी..!!

रानफुले बहरली
फेड़ी डोळ्यांची पारणी..
वारा घोंगावे कानात
सांगे पाखरांची वाणी..!!

किती वर्णावी महती
एक अनोखी पर्वणी
दिसे लाखात उठून
माझी कोकणाची राणी..!!
******सुनिल पवार.....

।। सुर सुन्या मैफिलिचे ।।

सूर सुन्या मैफिलीचे..

तुझ्या असण्याने असतात गं
भाव गहिरे मोहाचे।
तुझ्या नसण्याने वाहतात गं
अश्रु वेदनेच्या डोहाचे।
तुझ्या असण्याने रंगतात गं
खेळ चंद्र तारकांचे।
तुझ्या नसण्याने जमतात गं
ढग काळे आशंकांचे।
तुझ्या असण्याने फुलतात गं
फुलोरे मनाच्या सृष्टीचे।
तुझ्या नसण्याने सलतात गं
काटे नसत्या गोष्टीचे।
तुझ्या असण्याने नादतात गं
स्पंदने लयीत हृदयीचे।
तुझ्या नसण्याने भासतात गं
सुर सुन्या मैफिलीचे।
--सुनील पवार..✍️

|| कांदा ||

|| कांदा ||
********
रडवतोय कांदा,आता खाणे कसले
महागाईंच्या नावाने,मी डोळे पुसले..!!

नाकाने सोलने,दुरापास्त झाले
नावानेच डोळ्यात,पाणी आले..!!

उच्चांक नवा, गाठतोय कांदा
अडत्या करतोय,नफ्याचा धंदा..!!

गरीबाचा घास,हिरावतोय कांदा
आणायचा कुठून, रूपया बंदा..!!

कांदयावीना आता झालोय मिंधा
बेस्वाद जेवण,अन जिभेचा वांदा..!!
*******सुनिल पवार.....

|| पाळणाघर ||

|| पाळणाघर ||
=========
[बोल बाळबोध]
=========
काल होते हातावर
आज आहे काट्यावर
मम्मी पपा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!


कुटुंबाच्या त्रिकोणात
संक्रात आजी आजोबावर
संस्काराची धुरा सारी
आली आया मावशावर..
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!

गोड अक्षरांची आई
आली कधीच मॉमवर
बाबांचाही डॅड झाला
असतात नेहमी टूरवर
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!

रांगत होते बाळ गोजिरे
चिऊ काऊच्या घासावर
काळ बदलला आले सारे
शिस्तीच्या धोशावर..
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!

वेळ नाही घेण्या कडेवर
कसरत ही नित्य तारेवर
अवलंबून सारेच गरजेवर
कळतय जरी नाही बरोबर..
मम्मी पप्पा कामावर
झुलवतोय मला पाळणाघर..!!
******सुनिल पवार.....

II बात बन जाये II

II बात बन जाये II
===========
बदलते है इंसान यहा,
बदलते ही हालात..
जुदाई होती लंबी,
और छोटी मुलाक़ात..!!

मिलते है इंसान मगर,
ना मिलते खयालात..
मिल जाए दोन्हो अगर,
तो बन जाये बात..!!
*******सुनिल पवार.....

Saturday, 29 August 2015

|| नारळी पोर्णिमेचा सण आला ||

|| नारळी पोर्णिमेचा सण आला ||
===================
नारळी पोर्णिमेचा सण आला
घेवून रक्षा बंधनाला..

औक्षण करुया सागराचे
देईल रत्न तो सुखाचे..
औक्षण करुया भावाचे
देईल वचन तो रक्षणाचे..!!
अर्पुया नारळ सागराला
बांधुया राखी भावाला..
नारळी पोर्णिमेचा सण आला
घेवून रक्षा बंधनाला..!!

नाते अनोख्या प्रेमाचे
नाते हे बहिण भावाचे..
नाते अनोखे कृतज्ञतेचे
नाते हे कोळी सागराचे..!!
अर्थ देवुया धाग्याला
जागुया दिल्या वचनाला..
नारळी पोर्णिमेचा सण आला
घेवून रक्षा बंधनाला..!!
******सुनिल पवार....