Wednesday, 1 February 2017

|| आवड निवड ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| आवड निवड ||
===========
तू
जोपासू नको
केवळ
त्याची आवड..
कधीतरी काढ
चुकून
स्वतःसाठी सवड..
किती करशील
तू अशी
त्याच्यासाठी
जीवाची परवड..
कदाचित म्हणूनच
तू
बनून राहिलीस
केवळ
त्याची योग्य अयोग्य
निवड..!!
***सुनिल पवार..

युद्ध कधी शमणार..??

युद्ध कधी शमणार..??
==============
काय सांगू लेकी तुला
युद्ध कधी शमणार..??
वर्चस्वाच्या लढाईत
कोण माघार घेणार..?
हरल्याशिवाय एक
दुजा कसा जिंकणार..?
काय सांगू लेकी तुला
युद्ध कधी शमणार..??

युद्ध नसते ग लेकी
तुझ्या माझ्या अपेक्षेचं..
युद्ध असते केवळ
अंध मह्त्वाकांक्षेचं..
हरवलेल्या माणुसकीला
कोण कुठे शोधणार..?
काय सांगू लेकी तुला
युद्ध कधी शमणार..??
वर्चस्व राखण्यासाठी
होते शस्त्रांची निर्मिती..
अन निर्मिती शास्त्रांची
घेते प्राणाची आहुती..
खाक होईल क्षणात
राख मागे उरणार..
काय सांगू लेकी तुला
युद्ध कधी शमणार..?
***सुनिल पवार...✍🏽

|| उंची ||

|| उंची ||
=====
ते म्हणाले,
उंची वाढतेय
मी म्हणालो,
कसं शक्य आहे.?
माझी सुरवात
तर
हृदयापासून होते
आणि
हृदयातच संपते..!!
***सुनिल पवार...✍🏽😊

|| चौकट ||

💝तिच्यातील ती💝
=============
|| चौकट ||
======
तो रंगवतो
मनाच्या कॅनव्हासवर
आपल्याच मनाचे रंग..
अन
उमटवत जातो
तिच्या सुकोमल मनावर
विविध रंगछटा तरंग..
कधी वादळी, कधी तरल
प्रेमाचे, भावनेचे
त्याला वाटतील तसेच
त्यागाचे, तर कधी रागाचे..!!

ती समजून घेते
त्याचा प्रत्येक रंग..
अन
रंगवून घेते स्वतःस
त्याच्याच रंगात
बहुतेक फसवून घेते
तिला सोडायचा नसतो
त्याचा संग
म्हणूनच पचविते ती
लीलया
उठणारे अनेक वादळी तरंग..!!
विविध रंगात, विविध ढंगात
रेखाटलेल्या त्या
नानाविविध चित्र,विचित्र चित्रांना
त्याने
बसवून दिलीय
एक सुंदर सोनेरी चौकट..
अन
ती ही गुंतलीय
तितकीच भावनिक
त्या चमकदार चौकटीत
सजवत त्याची ग्यालरी
ज्याला ती घर म्हणते..
जपतेय.. उन्हा पावसातून
तितक्याच तन्मयतेने
लपवून
मनातील सारी घुसमट..!!
***सुनिल पवार....✍🏽

Thursday, 26 January 2017

|| आज/उद्या ||

|| आज/उद्या ||
==========
आज जोर धरलाय वाऱ्याने
चहुओर मनमुराद भिरभिरतोय..
फुलवित रोमांच मनात
शितलतेची अनुभूती देतोय..!!
डौलाने विहारतोय पतंग आकाशी
डोळ्यांचे पारणे फेडतोय..
गर्वाने भरून येतेय छाती
अन दोर प्रत्येक हातात दिसतोय..!!
बहरला धुंद प्राजक्त
श्वेत सडा
अंगणा अंगणात दिसून येतोय..
गंधित साऱ्या दिशा दिशा
जो तो श्वासात भरू पाहतोय..!!
पण उद्या मंद होईल वारा
घुसमटेल सामान्य जीव बिचारा.
डोलणाऱ्या पतंगास लागेल किनारा
कोमेजून जाईल प्राजक्त,
विरून जाईल गंध
अन मागे उरेल
केवळ निर्माल्याचा कचरा..!!
***सुनिल पवार...✍🏽
तरीही..
*****प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....

|| मी अंगिकारले ||

|| मी अंगिकारले ||
============
एकलव्याची साधना
शिकायची असते मला..
पण द्रोणाचार्यी मोह
कवटाळतो अर्जुनाला..
मग
गुरुदक्षिणेत नाहक
का गमवावे मी अंगठ्याला..!!

कर्णाची असीम जिद्द
वाटते घोळवावी अंगात..
पण परशुरामाची कृपादृष्टी
बदलते दाहक शापात..
अन
ब्रह्मास्त्री चाक हुकमी
रुतते विस्मृतीच्या चिखलात..!!

अश्वत्थामा बनून मग
शोधतो गुरु जन्मदात्यात..
पण होतो तिथेही घात
पीठ मिसळले जाते दुधात..
अन
उपकाराच्या मिंधेपणात
पुत्रास विसरतात तात..!!

संदीपनींच्या आश्रमात
होता मित्र कृष्ण सखा
पण स्वीकारेल का मला..?
प्रश्न शिवला नाही मनाला..
अन
मैत्रीच्या मूल्याखातर
मी अंगिकारले सुदाम्याला..!!
****सुनिल पवार....

|| सावली ||

|| सावली ||
==========
जीवन प्रवासात
चालत असता
सुख दुःख रुपी
उन्हात
आपलीच सावली
कधी छोटी
कधी मोठी होत असते..
परी
भय अथवा न्यूनगंड
मानायचे नसते..
कारण
अनुभवाचे चटके सोसत
ती
तावून सुलाखून
निघत असते..
अन
तीच सावली
मग
जगण्याचे नवे बळ
आपणास देत असते..!!
***सुनिल पवार...✍🏽