Thursday, 15 October 2020

मनाचे काही

 || मनाचे काही ||

==========
सूर्य मावळला म्हणजे अंधाराचे राज्य आले
असे समजू नये कधी काजव्यांनी..
आज अस्त झालेला उद्या पुन्हा उदयास येईल
याचे भान राखावे प्रत्येकांनी..!!१!!
जरी दृष्टीस भावला सुंदर चेहरा
तरी तो मनास प्रसन्नता देईलच असे नाही..
रंगवलेला साजरा चेहरा पाहून
देऊ नये कोणी त्याच्या मनाची ग्वाही..!!२!!
डाग चंद्रावरही असतो
म्हणून त्याचे महत्व नगण्य होत नाही..
लावलेला डाग तीटही असू शकतो
हे ममतेशीवाय कोणी जाणू शकणार नाही..!!३!!
तशी कोणतीही कृती अनाठायी नसते
हे स्वच्छ दृष्टिकोनाशिवाय कळत नाही..
पण ती कृती स्वार्थ की परमार्थ
हे भूमिकेत शिरल्याशिवाय समजत नाही...!!४!!
जगाची फसवणूक करता येईल एखादे वेळेस
पण मनाला फसवणे सहज शक्य नाही..
मन जागृत ठेवावे निरंतर अन्यथा मृत होईल
आणि मृत झालेल्या मनात माणुसकी उरत नाही..!!५!!
--सुनिल पवार...

No comments:

Post a Comment