Wednesday, 8 March 2017

|| मी नव्या युगाची सबल नारी ||

"गावकरी परिवर्तन आणि संशोधन प्रतिष्ठान" मुंबई व "मृदुगंध बहुउद्देशीय" संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक महिला दिना निमित्त निमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रश्स्तीपत्रावर माझ्या शब्दांना मिळालेले मानाचे स्थान..
आयोजकांचे खूप खूप धन्यवाद..

|| मी नव्या युगाची सबल नारी ||
=================
नको कुबड्या सहानभूतीच्या
मज हवे अधिकार समतेचे..
भेद न कोणता नजरेत माझ्या
मी हृदय विशाल ममतेचे..!!

नको बंधन संकुचित चौकटीचे
मज हवे आकाश निरभ्र मोकळे..
प्रिय मजला माहेर,सासर दोन्ही
मी मानते निश्चित सर्वांस आपले..!!

नको नुसते देव्हारे मढवलेले
मज हवे स्वयंप्रकाशित गाभारे..
खांद्यास तुमच्या भिडवून खांदा
मी चालते सक्षम स्वःआधारे..!!

नको केवळ भाट आसपास
मज हवी बैठक खरी विचारी..
कशास पत्करु मी लाचारी
मी नव्या युगाची सबल नारी..!!
***सुनिल पवार...✍🏼
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा👩🏻‍💼

Tuesday, 7 March 2017

II स्त्री II

तिच्यातील ती
=========
II स्त्री II
=======
आज ती
निराळीच भासली..
अद्दतद्दा भांडू लागली..
म्हणाली,
तुम्ही पुरुष
किती समजून घेता स्त्रीला..?
तुमच्या लेखी नेमकी
किती किंमत असते तिला..??
आणि सांगा मला,
स्त्री नक्की कळली का तुम्हाला..?

अचंबित मी उत्तरलो सावध
म्हणालो,
खरच कठीण आहे ग
तू न कळलीस कधी,
प्रत्यक्ष त्या विधात्याला..
मग
कशी कळणार तू मला..?
मी लावितो केवळ कयास
का लाविसी बोल खडे मज पामराला..!!
ती चिडली अधिक म्हणाली,
मग उचापती तरी करता कशाला..?
शरीरा व्यतिरिक्त
स्त्री कधी कळलीय तुम्हाला..?
तुम्ही मांडतां शब्दातून
तिच्या भोगाच्या,
असलेल्या, नसलेल्या रोगाच्या कथा..
वा मांडता कधी,
उत्तान शृंगाराच्या त्याच तशाच
चावून चोथा झालेल्या, रोचक गाथा..!!
टाळ्या पिटणारेही तयारच असतात
हळहळणारेही तेच असतात..
चंद्राला भाकरी म्हणणारे ते
ढळत्या पदारात सुद्धा चंद्रच शोधतात..
वखवखणाऱ्या नजरा,स्पर्श नेहमीचेच
पण
आता शब्दही तसेच सर्वांगावर फिरतात..
तुला वाटत असेल मोरपीस कदाचित
पण काट्यांनाही ते सहज लाजवतात..!!
आता
गृहीतच धरलंय प्रत्येकाने तिला
जो तो सरसावतोय तिच्या सहाय्याला
खरचं कळत नाही मला
काय म्हणावं तुमच्या अविर्भावाला..?
बाकी मानलं पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या कलेला..
किती हळुवार मारता तुम्ही फुंकर
जशी मारावी एखाद्या उंदराने
आणि कुरतडावे हळूच बोटाला..
इतक्या सराईतपणे कुरतडता सहज मनाला..!!
मी मूक ऐकून घेतले सारे
न बोललो त्यावर काहीच
आणि बोलणार तरी काय होतो..?
कारण मी सुद्धा एक पुरुष होतो..
इतकेच मात्र समजले मला..
देहाव्यतिरिक्त मन असते तिला..
तेच हवे आधी जाणायला..
तरीही कळणार नाही ती कधीच मला..
कारण स्त्री समजण्यासाठी,
धारण करावे लागेल स्त्री देहाला..!!
****सुनिल पवार....✍🏽

|| उत्तर ||

🌺सुप्रभात🌺
==========
🌹|| उत्तर ||🌹
==========
खरे तर प्रश्नाचे उत्तर
आपल्या आजूबाजूस असते..

पण भांबावल्या मनास ते
कुठे सहजासहजी दिसते..?
प्रश्नी गुंतले मन वेडे
अधिक गुरफडत जाते..
कळत नकळत उत्तरही मिळते
अन, उपरती पाठोपाठ येते..!!
****सुनिल पवार...✍🏽😊
http://marathi.pratilipi.com/sunil-…/abhagyach-bhagy-part-68

|| राज्य ||

|| राज्य ||
======
छोटंसं राज्य होतं
तेव्हा
तो झेलायचा
अन ती बोलायची..
त्याच्या कृतीला
ती हसत अनुमोदन द्यायची..!!

आता राज्य तेच आहे
मात्र
खातेदार वाढले
छोट्याशा राज्याचे
भावी वारसदार झाले
सहाजिक
कुठे कर वाढवावे लागले
तर कुठे घटवावे लागले
कधी वेळेला ऋण काढून
सण साजरे करावे लागले..!!
अजून ही राज्य तेच आहे
ती ही तशीच बोलते
मात्र
तो लगेच खंडन करतो
विरोधकांच्या बाकावर सारखा..
ती ही त्याच्या निर्णयाला
केराची टोपली दाखवते
सत्ताधारी पक्ष असल्या सारखा..!!
राज्य तसं छोटंच आहे
मात्र संसदेत
गदारोळ वाढता आहे..
संभ्रमित नवोदित तटस्थ दिसतोय..
मला वाटतंय
तो अनुभव घेतोय..
बोलू पाहतोय मध्ये
मात्र संधीच मिळत नाही..
सत्ताधारी म्हणतात
त्याला काही कळत नाही..!!
राज्य अजून तरी छोटंसं आहे
उद्या कदाचित विलग होईल
आजचा सत्ताधारी
उद्या पायउतार होईल
तसा
भावी वारसदार ठरलेलाच आहे
तोच
सत्ता काबीज करणार आहे
आता
पाहायचं मात्र इतकंच आहे
नेमकं परिवर्तन काय घडणार आहे..?
का कारभार जैसे थै राहणार आहे..!!
****सुनिल पवार...✍🏽

Sunday, 5 March 2017

II त्याची साथ II

🌺सुप्रभात🌺
==========
त्याच्या अस्तित्वाचा वाद
आपण जरा ठेऊ बाजूला..
जरी तो न दिसला तरी
येतो नित्य अनुभूतीला..
देव म्हणा, ईश्वर म्हणा,
अल्ला म्हणा, वा बुद्ध म्हणा
त्याची साथ असते नेहमीच
माणसातल्या माणुसकीला..!!
****सुनिल पवार...✍🏽
(आगामी कादंबरी "अभाग्याचं राजस भाग्य" मधून)

|| ती येते ||

|| ती येते ||
=======
ती येते
हळुवार झुळूक बनून
कधी, मनाचे वादळ लेवून
ती जाणवते प्रत्येक मनाला
पण
दिसत नाही कुणाला..!!

ती सळसळ जशी पानात
ती कुजबुज जशी कानात
ती जागवते रोमरोमाला
पण
दिसत नाही कुणाला..!!
ती चंचल जसे मन
कधी अवनी
तर कधी गगन
ती बदलत राहते रुपाला
पण
दिसत नाही कुणाला..!!
ती सुप्त तरी मुक्त
कधी तरल, कधी सक्त
लोक आठवण म्हणतात तिला
ती छळते क्षणा क्षणाला
पण
दिसत नाही कुणाला..!!
****सुनिल पवार...✍🏽

|| गुटर..ss गु ||

|| गुटर..ss गु ||
===========
त्यांची गुटर गु ऐकून
सहज
डोकावून पाहिलं खिडकीतुन
दोन कबुतरं,
आपसात भिडली होती..
ना जाणे अशी,
कोणती गोष्ट घडली होती..
जणू इरेला पेटले होते..
कधी चोचीने तर कधी पंखानी,
एकमेकास, मारत सुटले होते..!!

माणसाने नावाजलंय म्हणे
त्यांना
शांती दूत नामे गोंडस पुरस्काराने
पण वाटतंय
त्यांच्या ते गावीचं नसावे..
अन्यथा,
विसरले असते सहज
आपसातले सर्व हेवे दावे..
का माणसाकडूनच शिकले असावेत ते
सारे हेवे दावे
कोणी सांगावे..?
आणि तसंही
माणसाच्या नावाजण्याला
बिचाऱ्या पाखरांनी
का म्हणून मनावर घ्यावे..?
त्याने तरी कुठे आजवर
कोणा माणसावर सांगा
माणसाप्रमाणे प्रेम केले आहे..?
तसे असेल तर दाखवून द्यावे त्याने
पुरावे, दाखले असलेले,नसलेले
मगच
खुशाल नावाजावे इतरांस
अथवा बेशक पुरस्कृत करावे..!!
****सुनिल पवार...✍🏽