Saturday, 26 May 2018

|| परिणीती ||


|| परिणीती ||
=========
ही कोणती परिणीती
वादळास उध्वस्त करते..
खळबळ माजवून डोहात
चित्तास परावृत्त करते..!!
का गुंतते मन उगाच
आभासाच्या मृगजळात..
काय दडलेले असते असे
निसटून गेलेल्या श्वासात..!!
हे कोणते चक्र भिरभिरते
मम मस्तकाच्या आसपास..
का आतुर दिसते छाटण्या
उंच झेपावणाऱ्या पंखास..!!
कोण दडवितो काटे बेमालूम
मोहविणाऱ्या मोरपिसात..
का मीच ओढून घेतोय मलाच
अर्था अनर्थाच्या जाळ्यात..!!
**सुनिल पवार..✍🏼
(आगामी कादंबरी "वळणावरच्या वाटा " मधून)

पुस्तकावर बोलू काही

पुस्तकावर बोलू काही
===============
रमेश गोविंद वैद्य लिखित तसेच चपराक प्रकाशन द्वारा प्रकाशित “टर्मिनस व्हिक्टोरिया” ही अकल्पित कादंबरी वाचावयास घेतली अन खरं सांगायचं तर या लिखित व्ही.टी. च्या म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या भव्य वास्तूची बारीक सारीक तपशीलांसह तोंडओळख घेत, असंख्य आठवणींच्या कोलाजरूपी देखण्या चित्रात नकळत स्वतःस हरवून बसलो.
“टर्मिनस व्हिक्टोरिया” या एका कादंबरीच्या कॅनव्हासवर अनेक मनोहारी रंगछटा पाहायला मिळतात तशाच जणू अनुभूतीस येतात असं म्हटलं तर ते वागवं ठरणार नाही.
अकल्पित हा शब्दप्रयोग अशासाठी की, सर्व शक्य,असक्यतेचे वलय भेदून या कथेचा प्रवास आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलत, मार्गात भेटलेल्या सहप्रवाशांची सुखद ओळख देत,अकस्मात एका अकल्पित वळणार स्थिरावतो तेव्हाच खऱ्या अर्थाने हा प्रवास उलघडतो आणि मनास चटका लावून जातो.
या कथेच्या कॅनव्हासवर चित्रकार नायक व वसुधा नामे लेखणीस नायिका यांच्या उत्कट प्रेमाचे भव्य दालन, त्यातील प्रत्येक घटनेच्या विविध रंगछटांनी अतिशय देखण्या स्वरूपात रेखाटले आहे. तसेच या कथेच्या अनुषंगाने येणारे इतर रंगीय फटकारे म्हणजेच पात्र जसे अन्वर, डिसूझा, पोलिसवाले, डॉक्टर तसेच सहनायिका कांचन व तिचे आमदार वडील वगैरे अगदी मास्टर स्ट्रोक ठरावे इतके परिणाम कारक ठरले आहेत.
पहाटेपासून सुरू झालेला हा टर्मिनस व्हिक्टोरियामधील वाट पाहण्याचा आतुरतामय प्रवास सांजेपर्यंत त्याच्या,तिच्या सुखद आठवणींच्या आशामय स्वप्नील हिंदोळ्यावर झुलत असता अकस्मात कातरवेळ येते व आशंकांच्या धुक्यात मन हरवून जाते अन काळीज चिरत चोरपावली रात्र अवतरते. तिच्या गर्द काळोखात दृष्टीक्षेपात असणारे दृश्य क्षणार्धात अदृश्य होते अन तिची आठवण केवळ आठवण बनून राहते यासारखं दुःख ते कोणते?
मन हेलवणारी,नितांत सुंदरअशी अनोखी प्रेमकथा तसेच प्रत्येकाच्या संग्रही असावी अशीच ही कादंबरी चपराक प्रकाशनाच्या माध्यमातून वाचावयास मिळाली त्याबद्दल लेखक आणि चपराक प्रकाशनाचे मनस्वी आभार आणि खूप खूप शुभेच्छा.
सुनिल पवार…✍🏼

|| झाड/पाखरे ||

 
|| झाड/पाखरे ||
==========
रानात :
निष्पर्ण झाडावर
किलबिल पाखरे विसावली..
झाड म्हणाले
माझी गुणी लेकरे
पानं पानं झाली..!!
वस्तीत :
प्रत्येक झाड
अंतकरणातून टाहो फोडतेय
म्हणतेय
साली नालायक पाखरे
त्यांनी
झाडंच अडगळीत टाकली..!!
***सुनिल पवार...✍🏼

|| मोगऱ्याच्या फुला ||

|| मोगऱ्याच्या फुला ||
============
श्वेत मोगऱ्याच्या फुला
मंद सुगंधाचा झुला..
तिने डोईत माळला
शुभ्र चांदण चौफुला..!!

दिव्य प्रकाशित आभा
काळ्याभोर अंबराला..
व्यापे नयनांच्या नभा
डौल न्यारा गजऱ्याला..!!
तिने डोईत माळला..

हालचाल मनोहर
भुल पडते क्षणाला..
नागिणीची चपळाई
दंश होतो सर्वांगाला..!!
तिने डोईत माळला..

धुंद नाजूकशा फुला
सौदामिनी तू चंचला..
नको नादावू वाऱ्याला
कसं सावरू मनाला..!!
तिने डोईत माळला
शुभ्र चांदण चौफुला..!!
***सुनिल पवार..✍🏽

Tuesday, 1 May 2018

|| आठवण ||

|| आठवण ||
=======
आठवणींची
आठवण सरता
मन क्षणिक 
हलकं झाल्यासारखं भासते...
पुन्हा आठवण येते
अन
मनाचे माप भरून येते..!!
कालचक्राचा
दोलायमान लोलक
कधी उजवीकडे
तर कधी डावीकडे
झुकत राहतो...
मनाची सांगड घालत
उन्ह सावलीचा खेळ
असाच
निरंतर चालत राहतो..!!
**सुनिल पवार...✍🏼

ll हायकू* उन्हाच्या ll

हायकू* उन्हाच्या
==========
*१*
आग ओकतो
सूर्य धरणीवर
बळी राबतो..!!
*२*
पक्षांचा वास
निष्पर्ण झाडावर
पानांचा भास..!!
*३*
पाणी आटले
विहिरी तळ्यातले
डोळा दाटले..!!
*४*
भेगा भुईच्या
वाचून पहा कोणी
रेषा भाळीच्या..!!
*५*
रस्ता अतृप्त
पायपीट अखंड
जीवन लुप्त..!!
**सुनिल पवार..✍🏼