Wednesday, 11 February 2015

।। लाल गुलाब ।।

।। लाल गुलाब ।।
**************
रोज वाटायचे मला
तुला लाल गुलाब द्यावा
भाव माझ्या मनातला
फुलातून व्यक्त व्हावा..!!

औंदर्य फुलांचे सौंदर्य तुझे
सुरेख तयांचा मेळ व्हावा
तुझ्या माझ्या मिलनाचा
अलवर धुंद वेळ यावा..!!

पण
नव्हते काहीच नशिबात
राहिल्या गोष्टी साऱ्याच मनात
धजले ना मन कधी
फिरे माघारी क्षणात..!!

कित्येक गुलाब खरीदले
पाकळ्या विचारात सुकल्या
तुझ्या माझ्या भेटीच्या
बहुतेक वाटा चुकल्या..!!
*********सुनिल पवार...

II गीत II


II गीत II
*********
गीत तुझ्या ओठांचे, आता ना मज गायचे..
त्या हरवल्या सुरांनी, काय गुणगुणायचे..!!

उधळीत चांदण्या अशा , मैफिलीत सजायचे..
ओलेत्या पापण्यांनी , काय व्यर्थ हसायचे..!!

सांभाळू कसे मनास , वेड्यास ना कळायचे.
घेऊन कवेत काजळ, का वातीने जळायचे..!!

तालावल्या ह्या गर्दीत , माझ्यात मी रमायचे
नाहीच मेळ मनाचा , तिथे काय जमायचे..!!
***********************सुनिल पवार...

।। डोकावता बालपणात ।।

।। डोकावता बालपणात ।।
**********************
सहज डोकावले बालपणात
स्वच्छंद त्या वेड्या क्षणात..
बालपणीचे खेळ सारे
घालू लागले रुंजी मनात...!!

विटीदांडू लगोरीचा डाव न्यारा
आबादुबीचा राकट मारा
क्रिकेटचा सारा रंगच न्यारा
गल्लित भरे स्टेडियम सारा..!!

आट्या पाट्यांचा डाव सुरेख
खेळु कबड्डी तंगड़ी खेच..
रंग बिरंगी गोट्यांची ठेव
बुद्धिबळ घाली भलताच पेच..!!

कांदा फोडीच्या उंच उड्या
लपाछपित त्या मारल्या दड्या..
गिरकी घेई मधेच भावरा
कधी कुणाच्या काढल्या खोड्या..!!

नवा व्यापार झब्बू गुलाम चोर
बैठ्या खेळाचा भलताच जोर..
कधी आकाशी उंच पतंग
कधी तुटायचा कोणाचा दोर्..!!

दूरदर्शनचा काळ रमणीय फार
छाया गीत कधी चित्रहार..
रामायणाचा तो रमणीय भाग
ज्ञान दिप उजळी सुंदर विचार..!!

सांगू तरी किती मी खेळाचार
यादि मोठी नाही संपणार..
सरले बालपण बदलले आचार
मागे उरला आठवाणीचा आधार..!!
**************सुनिल पवार...

II अबोल माझ्या मना II

II अबोल माझ्या मना II
***********************
अबोल माझ्या मना
बोल काही तरी..
भेद तुझ्या मनातले
खोल आता तरी..!!

वेळ जाईल निघून
नाही येणार परतून
उडून जातील पक्षी
सारेच घरट्यातून,,!!

नको धरू अबोला
आता सोड दुजाभाव..
मनाचे तुझ्या औंदर्य
तू ही जगाला दाव..!!

घाल सर्वांस साद
ना राहणार विसंवाद..
एकोप्याने नांदू सारे
साधून गोड संवाद..!!
**********सुनिल पवार..

Wednesday, 4 February 2015

II चारोळी पुराण II

II चारोळी पुराण II
******************
चारोळीत असतात शब्द चार
चार शब्दांचे थोर विचार..
शब्द कमी बोलते फार
चारोळी देते जीवनास आकार..!!

मिश्किल कधी हास्य फुवार
कधी भासते तिखट मार..
शब्दांना तिच्या भलतीच धार
करते हळुवार काळजावर वार..!!

प्रेम आर्जवे ती कधी फार..
कधी असते विरहाची किनार..
शब्दात तिच्या अलवार श्रुंगार
प्रेमाचे अनेक चढ उतार ..!!

स्वप्न कधी घेते आकार
कधी बनते व्यंग टीकाकार..
शब्दाचा असा सुरेख अलंकार
थोडक्यात सांगतो जीवनाचे सार..!!
*********************सुनिल पवार.....

II एक ओळख अनोळखी II


एक ओळख अनोळखी...
एक ओळख अनोळखी
नजरेत घर करत गेली..
स्मृतीकिरणांचे अमूल्य मोती
ओंजळीत भरत गेली..!!
पैंजणांची रुणझुण जशी
गोड संवाद साधत गेली..
मौन साऱ्या भावनांना
हृदयातून दाद देत गेली..!!
आले भरून आकाश
दाटी मेघांची होत गेली..
मन चिंब चिंब भिजले
ती सर जशी बरसत गेली..!!
मी सहज मांडले शब्दातून
ती स्तुतीसुमने घेत गेली..
माझ्या अंतरातील कविता
माझ्या हृदयातून फुलत गेली..!!
***सुनिल पवार...✍️

Monday, 2 February 2015

II सखे II

II सखे II
*********
फिरून जन्म घ्यावे
सखे तुज समीप यावे..
तव बागेतील फुल बनुनी
नित्य तुज रिझवावे..!!
सखे,
नित्य तुज रिझवावे..!!

पहाट समयी तू अंगणी यावे
सखे, दर्शने मी खुलावे..
गुंफता मज श्वासात मग..
मन वा-यावर झुलावे..!!
सखे,
मन वा-यावर झुलावे..!!

हळूच मज स्पर्शावे
सखे, रोमांचित मी व्हावे..
माळता मज केशात मग
कुंतली मी खेळावे..!!
सखे,
कुंतली मी खेळावे..!!

नित्य तू सजावे धजावे..
सखे, तुज सवे फिरावे..
मधुर तुझ्या सहवासात
नित्य मीच असावे...!!
सखे,
नित्य मीच असावे...!!
**************सुनिल पवार....