Sunday, 29 July 2018

|| पावसाचं प्रेम ||

 
|| पावसाचं प्रेम ||
===========
कधी वाटते
पावासाचं प्रेम म्हणजे
अळवावरचं पाणी
झोकुन देतो स्वतःस
कधी धरणीच्या पायी..
कधी दौडतो बेफाम
अल्लड सरितेच्या लयीत..
तर कधी लुप्त होतो
सागराच्या हृदयात..
पण तरीही
तो अस्तित्वात उरतो
ठायी ठायी..!!
**सुनिल पवार...✍🏼

|| पाऊस ||

|| पाऊस ||
=======
तो येतो, बरसतो
अन् निघून जातो..
तरीही अंतरी ओलावा
रुजून राहतो..!!
तो नसतो कधी तेव्हा
आठवणीस गहिवर येतो..
तो आला न आला तरीही
डोळ्यास पाझर फुटत जातो..!!
कधी रिमझिम रिमझिम
कधी धुंद करून जातो..
तुझ्या नी माझ्या मनात
पाऊस रेंगाळत राहतो..!!
तो येतो, बरसतो
अन् निघून जातो..!!
***सुनिल पवार..✍🏼

मुंबईचा पाऊस

 
मुंबईचा पाऊस
==========
मुंबईचा पाऊस
तसा भिन्न आहे जरा..
कुठे सुखाच्या सरी
तर कुठे दुःखाचा पसारा..!!
खिडकीतून डोकावणारा
मनास भुलवणारा..
छतातून गळणारा
डोळ्यातुन पाझरणारा..!!
मुंबईचा पाऊस..
कुठे रस्त्यात थांबणारा
कधी अविरत चालणारा..
चहाच्या संगतीने
भजीवर ताव मारणारा..!!
मुंबईचा पाऊस...
शाळेच्या भोवती
तळे साचवणारा..
आयाबायांच्या जीवास
घोर लावणारा..!!
मुंबईचा पाऊस..
हातावरच्या पोटाला
चिमटा काढणारा..
कुणाच्या हातातील
ग्लासात फेसाळणारा..!!
मुंबईचा पाऊस...
बातम्यातून सुखावणारा
सत्यात वेगळा असणारा..
तुमच्या लेखी तोच
स्पिरिट जागवणारा..!!
मुंबईचा पाऊस
तसा भिन्न आहे जरा..
***सुनिल पवार...✍🏼

|| नजराणा ||

|| नजराणा ||
========
मी पाहतो तुज येता जाता
स्वप्नास कवेत घेताना..
मी तुझ्यात गं रमताना
अन् तू माझ्यात मिसळताना..!!
तू झेलून घेतेस धारा
मी झरझर झरझर झरताना..
अन् मोहित होते मन माझे
तू मंद धुंद दरवळताना..!!
स्वर्ग सुखाची अनुभूती होते
तुज देखोनी मोहरताना..
तुझे लाजणे भावते मनास माझ्या
तू धुके पांघरून घेताना..!!
नादावते गं मन वाऱ्याचे
तू हिरवळ लेवून घेताना..
मी नजर चोरटी मारतो तुजवर
तू पदर सावरून घेताना..!!
बघ लोकांच्याही वळल्या नजरा
तू फुले माळून घेताना..
अन् मीही घेऊन आलो तुजला
सप्तरंगाचा मोहक नजराणा..!!
--सुनिल पवार...✍🏼
भारत जगताप, Ratna Kamble and 25 others
23 Comments
94 Shares
Like
Comment
Share

|| पाऊस आला ||

|| पाऊस आला ||
===========
आज तो
त्याच्या लवाजम्यासह
तिला रंगवायला आला..
अन् तीही नखशिखांत रंगली
तिच्या चिल्ल्या पिल्ल्यांसह
नाचू लागली..
विजांचा कडकडाट
ढगांचा गडगडाट
ढोल ताशांचा आभास झाला..
पाऊस आला, पाऊस आला..!!
***सुनिल पवार..✍🏼

|| पहाट पावसाळी ||

पहाट पावसाळी..
सरी मोत्यांच्या गुंफत
आली पहाट अंगणी..
पाखरांच्या चोचीतली
चिंब चिंब झाली गाणी..!!
खिडकीत डोकावतो
गार अवखळ वारा..
अंग अंगास झोबतो
थेंब थेंब निलाजरा..!!
गोड शहारा उठतो
अंगी रोमांच फुलतो..
सुमनांच्या देहातून
गंध वेडापिसा होतो..!!
असा पहाट देखावा
भूल डोळ्यास पाडतो..
सृष्टीवर पावसाचा
जीव वेडा रे जडतो..!!
--सुनिल पवार..✍🏼

*हायकू पावसाच्या*

*हायकू पावसाच्या*
==============
दाटून आले
मेघ आसमंतात
भीती मनात..!!
पाऊस आला
झरझर झरला
आसवे झाला..!!
पाऊस धारा
अवनीस भेटल्या
गहिवरल्या..!!
तळे साचले
रस्त्यात उतरले
चिखल झाले..!!
कातर वेळ
अंधारलं आकाश
भास डोळ्यास..!!
**सुनिल पवार...✍🏼

|| लक्ष्मण रेखा ||

|| लक्ष्मण रेखा ||
===========
हे लक्ष्मणा,
तू आखून गेलास रेखा
तिचे रक्षण व्हावे म्हणून
पण तिने ओलांडली ती अनिच्छेने
अन् उभ्या आयुष्याची अग्नीपरीक्षा झाली..!!
आणि म्हणूनच
तिने धसका घेतलाय त्या रेषेचा
ओलांडावी तर
जागोजागी रावण टपलेला
न ओलांडावी
तरीही वाट्यास कुचंबणा
ना कळणार कधी ती तुला
नाही कळली कधी रामाला..!!
हे लक्ष्मणा,
असेलही तुझा हेतू शुद्ध
मात्र तरीही तू चुकला होता
बघ ती तुझी रेषा
तिला अजूनही स्पष्ट दिसतेय
आणि ती बिचारी तिथेच घुटमळतेय..!!
कदाचित
तिला शस्त्र,अस्त्र सज्ज केले असते
तर तिचे हरण करण्या
रावणही धजला नसता
मग रेषेचे अस्तित्वच उरले नसते
अन् तिनेही
मोकळा श्वास घेतला असता
इतके मात्र खरे
रेखा आखून तू चुकला होता..!!
***सुनिल पवार...✍🏼