Monday, 30 December 2013

II संकल्प II

संकल्प..

दर वर्षी नवीन वर्ष येते
संकल्पाची खुमारी येते..
पण
आंधळ दळतं अन कुत्र पीठ खातं
अशीच त्याची गत होते..!!

काही तरी करावेसे वाटते
पंखात बळ भरावेसे वाटते..
मन उत्तुंग गगनी भरारी घेते
नव्या संकल्पाची कास धरते..!!

काही दिवस छान पालन होते
मनास खूप हायसे वाटते..
नकळे कुठे माशी शिंकते
सगळचं धाराशाही होते..!!

जगण्याच्या रहाट गाड्यात
मन तसेच पिचले जाते..
संकल्पाच्या कबरीवर मग
नकळत मुठ माती चढते..!!

बघता बघता वर्ष सरते
मुडद्यास पुन्हा जाग येते..
नव्या वर्षाच्या नव दिनी..
नव संकल्पाचे रोप रुजते..!!

आमचं आपलं असच असते
सरता वर्ष आठवण होते..
संकल्पाच्या बाबतीत आमचं
ये रे माझ्या मागल्या असते..!!
--सुनिल पवार..



Monday, 23 December 2013

II वेडी आस II

II वेडी आस II

चंद्रास काय ठावे..
वेड वेड्या सागराचे..
खेळ खेळे मजेत..
चंद्र कले कलेचे..!!

नजरेतला चंद्र..
राहिला कुठे दूर..
सागराच्या डोळा..
वाहे अश्रुंचा पूर..!!

उधाणला सागर..
आतुर चंद्र मुखास..
फिरून येई खाली..
व्यर्थ सारे प्रयास..!!

झेले त्यास किनारा..
व्यर्थ त्याची आस..
तोडे हृदय सागर..
पर्वा नसे त्यास..!!

काय म्हणावे प्रेमास..
कोणास कुणाची आस..
कोण लावी जीव..
कोणास होई त्रास..!!

*चकोर*

Thursday, 19 December 2013

II क्षण II

II क्षण II

सरता आयुष्य मागे..
मोह हो-तो क्षणाचा..
वेचु पाहतो त्या क्षणा..
जो होता आठवणींचा..!!

किलकिले करू पाहे..
कवाड़ बंद साठवणीचे..
धरू पाहतो कवडसे..
जे डोकावती आठवणींचे..!!

फोल ठरले प्रयत्न सारे..
हाती काही ना उरले..
क्षण मृगजळापरी ते..
सहज नयनी तरळले..!!

*चकोर*



Thursday, 7 November 2013

II नित्याचेच II



II नित्याचेच II

विरहाचे  गाणे..
अश्रुंचे तराणे..
दुखाःचे सजणे..
अन..
माझे भिजणे..
नित्याचेच..!!

वाट पाहणे..
तुझे न येणे..
मनास समजावणे..
तरी..
ना मानणे..
नित्याचेच..!!

स्वप्न पाहणे..
रात्र जागणे..
गडद अंधारणे..
अन..
स्वप्न भंगणे..
नित्याचेच..!!

खेळ खेळणे..
खेळणे होणे..
तुझे छळणे..
अन..
माझे जळणे..
नित्याचेच..!!

*चकोर*