Monday, 15 October 2012

आजचा गणेशोत्सव

आजचा गणेशोत्सव.... मी पाहिलेला....

 नमस्कार मित्रानो,

अनंत चतुर्थी गणरायाला निरोप द्यायचा दिवस. मुलांनी सुद्धा हट्ट धरला की,लालबागला जाऊन विसर्जन सोहळा पाहायचा आणि लालबागच्या राजाच दर्शन घ्यायचं म्हणून मग मी सुद्धा निघालो सहकुटुंब गणरायाला निरोप द्यायला तसेच विसर्जनाचा सोहळा पहायला.साधारण बारा ते साडेबारा वाजता आम्ही तिथे पोहचलो.आणि एका मोक्याच्या जागी जाऊन उभे राहिलो.जेणेकडून गर्दीचा त्रास मुलांना सहन होणार नाही आणि गणरायाच दर्शन सुद्धा सुलभ होईल..लालबाग च्या परिसराला जत्रेच रूप प्राप्त झाल होत नव्हे तर अवघ्या मुंबापुरीत तशीच परिस्थिती होती..अबालवृद्ध अगदी उत्साहाने गर्दीत सामील झाले होते..आयाबाया त्यांच्या तान्हुल्याकडे एक डोळा तर दुसरा विसर्जनाच्या वाटेवर लावून बसले होते.तर पिता म्हणजे कुटुंब प्रमुख हे त्यांच्या खाण्यापिण्याकडे तसेच सुरक्षेकडे लक्ष ठेऊन होते..हळू हळू एकेक गणराजाच आगमन होऊ लागले..जसे  गणराज जवळ येत होते तसे प्रत्येकाचे कॅमेरे सरसावत होते जेणेकरून गणरायाची छबी आपल्या कॅमेरा रुपी मंदिरात कायम वसावी आणि आपणाला हव तेव्हा त्याचे दर्शन घेता यावे हाच उद्देश असावा नाही या मागचा..असो जसजसे गणराज जवळ येत होते तसतसे ढोल नगारे ताश्याचे आवाज तीव्र होत होते,फटाक्याची आतिषबाजी होत होती आनंदाचा कलश ओसंडून वाहात होता. एकेक करत बहुतेक गणराज मार्गी लागले पण ज्याची जनसागर आतुरतेने वाट पहात होता तो लालबागचा राजा थोड्याच वेळात तिथे अवतीर्ण झाला आणि एकच जल्लोष झाला..विशाल जन समुदाय लोटला होता त्या राजाला निरोप द्यायला जणू सागर थिटा पडावा..एखादी प्रचंड लाट येऊन थडकावी तश्या प्रकारे काहीस दृश्य अनुभवले मी तिथे..थोड्याच वेळात राजा तेथून मार्गस्थ झाला आणि सागराला ओहटी लागावी तशी आता पर्यंत ताटकळलेली माणस आपापल्या घरी परतु लागली...सहा ते सात तासाचा सोहळा पाहून मी सुद्धा काही प्रश्न घेऊन घरी परतलो.कुपया निरसन करा..
प्रश्न असा की लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत प्रसाद म्हणून वाटण्यात येणारे लाडू चक्क भक्तगणांकडे फेकते जात होते आणि लोक सुद्धा तो लाडू मिळवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते..इतक्या प्रचंड गर्दीत कुत्र्या मांजराप्रमाणे एकमेकांकडून हिसकावून घेत होते.अधिकत्तम प्रसाद पायदळी तुडवला जात होता..
ह्यातून आपण काय मिळवतो..?? अश्याने त्या प्रसादाच पावित्र्य जपलं जात..?? कार्यकर्त्यांनी याच भान राखायला नको..? आणि ह्यात एखादा भक्त जायबंदी झाला तर नुकसान कोणाच..?? ह्याचा विचार भक्तगणांनी करायला नको..?? परवा एका वर्तमान पत्रात वाचले की,एका कार्यकर्त्याने महिला पोलिसाच्या श्रीमुखात भडकावली..आता तुम्ही सांगा अशा अमानुष कार्यकर्त्यांना मंडळाने वेळीच आवर घालावयास नको.?? खर तर त्याना नैतिकतेचे धडे उत्सवापूर्वी देण्याची नितांत आवशकता आहे..जेणे करून कार्यकर्ता हा खर्या अर्थाने कार्यकरता ठरेल..आणि हो.आणखी एक महत्वाचे..ते म्हणजे हल्ली प्रत्येक मंडळामध्ये एक अहमिका लागली आहे ती म्हणजे अशी की,इथे प्रत्येक मंडळ म्हणते की,आमचा गणपती मुंबईचा राजा.आणि आमचाच गणपती नवसाला पावतो..गणराज एक पण इथे मंडळांनी त्यांचे तुकडे केले..ह्यातून काय साध्य केले.?? देव भक्तीचा भुकेला..शुद्ध भावनेने घरातून केलेला नमस्कार सुद्धा पोहचतो देवाला..पण हे कसे कळणार गणेशोत्सव मंडळांना..? पैसा आणि प्रसिद्धीसाठी उतरत चालले आहेत खालच्या थराला....देवा गणराया माफ कर त्या पामराना...असशील तू खरा तर सद्बुद्धी दे तुझ्या लेकराना..सद्बुद्धी दे लेकराना...
(सुनिल)